देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांचे कुलदैवत खंडोबा महाराज यात्रोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही उद्या बुधवार दि १२ फेब्रुवारी व गुरुवार दि.१३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा व यात्राउत्सव शांतेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित कदम यांनी केले आहे.
यंदाच्या वर्षी यात्रेनिमित्त अनेक धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.बुधवार दि.१२ फेब्रुवारी रोजी होमहवन,गंगास्नान,आभिषेक,भव्य पालखी सोहळ्यात लेझीम,सनई,संबळ,डफ,चोपड्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.सायंकाळी छबिना मिरवणुकीत नामवंत ब्रास बॅन्ड पथकांची जुगलबंदी होणार आहे.रात्री सोलापूर,वांबोरी,अहिल्यानगर येथील शोभेच्या दारुकामाचा आतषबाजीचा सामना होईल.दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहे.यामध्ये मल्हार केसरीच्या मानाच्या चांदित्या गदेचा मानकरी होण्यासाठी अनेक नामवंत पहिलवान मैदानात उतरणार आहेत.अंतिम नेत्रदीपक व चिटपट कुस्ती करणाऱ्या पहिलवानाचा मल्हार केसरी हा मानाचा किताब व चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येणार आहे.यानंतर रात्री ९ वाजता सुंदरी' हा मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
Post a Comment
0 Comments