Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन बळजबरीने चोरी करायला लावणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील दोन महिला गजाआड...


राहुरी (प्रतिनिधी) :

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत चोरी करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलिस पथकाने विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन जेरबंद केले.तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राहुरी पोलिस ठाण्यात दि.२५ जानेवारी २०२५ रोजी शहरातून मोटरसायकल चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सुरु असताना एका गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की,राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करत असून तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणलेले आहे व त्याच्याकडून ती बळजबरीने चोऱ्या करून घेते. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप ठाणगे,विजय नवले,सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे,सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख,जयदीप बडे आदि पोलिस पथकाने आरोपी रेखा शरद पवार,वय २९ वर्षे,विक्रांत संजय ससाने,वय २१ वर्षे,अमिषा सिलीमान सय्यद,वय २१ वर्षे,सर्व रा. प्रसाद नगर,राहुरी फॅक्टरी,या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.मात्र पोलीस पथकाने पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाले.सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले.

अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालया समोर हजर केले असता,न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.या दरम्यान तपास करत असताना पोलिस पथकाने आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकल,गाड्यांचे टायर,हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण ४ लाख २५ हजार ४०० रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments